बुधवारच्या देशव्यापी संपात कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय, खासगी उद्योगांतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर व जिल्हा बँकेचे कर्मचारी सहभागी

कोल्हापूर (द फायर प्रतिनिधी) ः विविध मागण्यांसाठी सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी उद्योगांतील कर्मचारी, जिल्हा बँकेचे कर्मचारी बुधवारी (दि. ८) संपावर जाणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरात बुधवारी सर्व शासकीय, शाळा, बँका तसेच खासगी उद्योगातील कामकाज ठप्प राहणार आहे.

जुनी पेन्शन लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि कामगार संघटनांचे दीड लाख कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत. हे सर्व जण बुधवारी सकाळी १० वाजता टाऊन हाॅलमधील बागेत जमतील. तेथून ते मिरवणुकीने बिंदू चौकात जातील. तेथे सर्व प्रमुख वक्त्यांची भाषणे होतील, अशी माहिती निमंत्रक अनिल लवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील पाच हजार शाळा आणि ५० हजार शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शैक्षणिक व्यासपीठचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी दुसऱ्या पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षक आणि राज्य सरकारी कर्मचारी असे ९० हजार आणि इतर ६० हजार कर्मचारी असे एकूण दीड लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी होतील. जुनी पेन्शन योजना लागू करा, केंद्रीय, राज्य कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध ११ संघटनांनी देशपातळीवरील बंद पुकारला आहे, असेही लवेकर यांनी सांगितले.

 

नागपूर येथे २२ डिसेंबरला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना यांनी बुधवारी (दि. ८) राज्यव्यापी बंदचे आवाहन केले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था, मुख्याध्यापक संघ आणि शैक्षणिक व्यासपीठ या सर्वांनीच बंदला पाठिंबा दिला असल्याची माहितीही लाड यांनी दिली.

 CommentsLeave a CommentWhatsApp