अखेर तेलनाडे बंधूंचे नगरसेवक पद रद्द

इचलकरंजी : द फायर - प्रतिनिधी

इचलकरंजी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना सलग सहा महिने गैरहजर राहिल्यामुळे नगरसेवक संजय व सुनील या तेलनाडे बंधू यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

याबाबतचा प्रस्ताव मुख्याधिकारी दिपक पाटील यांनी पाठविला होता. पालिका सभेत तेलनाडे बंधूंच्या रजेच्या अर्जावर ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागले होते. विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तेलनाडे बंधूंवर मोका अंतर्गत कारवाई झाली आहे. तेव्हापासून नगरसेवक संजय व सुनिल तेलनाडे फरार आहेत. ते गेल्या सहा पालिका सभांना गैरहजर राहिले आहेत. पालिका सभेतही त्यांच्या रजेबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे मुख्याधिकारी पाटील यांनी तेलनाडे बंधूंचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला होता.

सुनावणी दरम्यान तेलनाडे बंधूंच्यावतीने विधी तज्ञांनी बाजू मांडली. त्यामध्ये पालिका सभेत सहा महिन्यात रजा अर्जावर ठोस निर्णय न झाल्यामुळे तो आपोआप मंजूर होतो, असा युक्तीवाद मांडला होता. रजा नामंजूर करण्यासाठी पोलिस यंत्रणेनेही मोठे प्रयत्न केले होते. दरम्यान, यापूर्वी पाठविण्यात आलेला प्रस्ताव परिपूर्ण नव्हता. त्यामुळे पहिला प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यानंतर पून्हा एकदा नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

अखेर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नगरसेवक संजय व सुनील तेलनाडे यांना सलग सहा महिने पालिका सभांना अनुपस्थित राहिल्याचे कारण देत त्यांना अपात्र ठरवित असल्याचा  आज निर्णय दिला. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यांना या निर्णयाविरोधात राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. यातील संजय तेलनाडे हा बिनविरोध निवडून आला होता.CommentsLeave a CommentWhatsApp