आता मिशन कोविड झिरो: मंत्री हसन मुश्रीफ यांचा मंत्र; चेस द व्हायरस

कागल:द फायर:प्रतिंनिधी:

कोरोना जागतिक महामारी आटोक्यात आणण्यासाठी सर्वच यंत्रणा जीवावर उदार होऊन अथकपणे काम करत आहेत. आता यापुढच्या काळात अधिक जबाबदारीने काम करून "मिशन कोविड झिरो" हेच ध्येय घेऊन वाटचाल करूया, असा मंत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

कागलमध्ये डी आर माने महाविद्यालयात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्री. मुश्रीफ बोलत होते. कागल तालुक्याच्या प्रत्येक गावात घरोघरी नागरिकांची तपासणी करून संशयितांना तात्काळ बाजूला काढा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी रोगी शोधून काढला पाहिजे तरच ते कुटुंब वाचेल. लोकांनी सुद्धा लक्षणे आढळल्यास दुखणं अंगावर न काढता किंवा समाजाला न घाबरता स्वतः बाहेर येत तपासणी करून घेतली पाहिजे. बाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील होईल. जगभरात अनेक देशांनी विकसित केलेल्या कोरोना लसी दृष्टिक्षेपात आहेत. परंतु या माध्यमातून बाधितांवर उपचार होण्यासाठी काही अवधी लागणार आहे.

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल तालुक्‍यात एकूण 141 जण कोरणा पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी 73 पूर्ण बरे झाले आहेत, 63 जणांवर उपचार सुरू आहेत. कागलमधील ३ व दौलतवाडी येथे एक असे चार मयत झाले आहेत. कागलच्या कोविड काळजी केंद्रासह इतर ठिकाणी ऑक्सीजनसह 40 बेडची व्यवस्था आहे.येत्या काळात अडीचशे बेडची सुविधा करण्याचे नियोजन असून त्यातील 100 बेड ऑक्सिजनसह असणार आहेत.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, कृषी अधिकारी श्री. माळी, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिंदे, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अतुलनीय योगदान

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असतानाच वैद्यकीय कर्मचारी अथकपणे रात्रंदिवस लढा देत आहेत. या संकटात सर्वात महत्त्वाची जबाबदारी तेच पार पाडत असून त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे.

सणादिवशीही कर्तव्यनिष्ठा ....

कागलचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर म्हणाले, सव्वादोन महिन्यापूर्वी रमजान ईद होती. त्यादिवशीही कोरोना महामारीचा लढा देण्यासाठी बैठक झाली होती. आज बकरी ईद आहे. या दोन्ही दिवशी मंत्री हसन मुश्रीफ कर्तव्यभावनेने कोरोनाच्या लढाईत कंबर कसून आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp