जिल्ह्यातील प्रलंबित मागण्या आणि संभाव्य महापुराच्या स्थितीचा ना. हसन मुश्रीफ व पालक मंत्री सतेज पाटील यांनी घेतला आढावा

कोल्हापूर :द फायर:प्रतिंनिधी: जिल्ह्यातील प्रलंबित मागण्यांसाठी शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. अशा सर्व  मागण्यांसाठी विशेषत: नुकसान भरपाईसाठी वित्त मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तर मागील महापुराचा अनुभव लक्षात घेता संभाव्य महापुराच्या मुकाबल्यासाठी प्रशासनामार्फत योग्य नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात बोटिंची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्सूनपूर्व आढावा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे आज झाली. या बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

सुरूवातीला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही तयारी विषयी माहिती दिली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर मारूलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, बीएसएनएलचे महाप्रबंधक शिवराम कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे या सर्वांनी आपापल्या विभागाच्या पूर्वतयारीबाबत आणि नियोजनाविषयी सविस्तर आढावा घेतला.

व्हिसीव्दारे सहभागी झालेले खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, नंदकुमार वडनेरेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी केलेले मार्गदर्शन जिल्ह्यासाठी मागवून घ्यावेत. पूर का येतो याचा अभ्यास होणे महत्वाचे आहे. केंद्र शासनाच्या समावेशनाने कोल्हापूर आणि नजिकच्या जिल्ह्यासाठी 3 प्रतिनिधींची समिती स्थापन करावी.

खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, चिखली, आंबेवाडी यासारख्या बाधित गावांना स्थलांतरासाठी आधीच नोटीस पाठवावी. गगनबावडामधील टेकवाडीचे पुर्नवसन करण्यासाठी जागा उपलब्ध करावी. रेडेडोहच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी नळे घालावेत. जनावरांच्या छावण्यांबरोबर चाऱ्याचेही नियोजन व्हायला हवे.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले सद्या कोव्हिडमुळे शाळा, सार्वजनिक सभागृह आधीच ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे महापुरात स्थलांतरीत कुटूंबांसाठी नियोजन करावे लागणार आहे. उंचावरील भाग, माळरान आधीच तपासून तयार ठेवावेत. शिरोळ तालुक्यावर अधिक लक्ष द्या. कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकोळी, सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर बैठक होणार आहे. महापूर येवूच नये म्हणून पाटबंधारे विभागाने दक्ष राहून नियोजन करावे.

खासदार धैर्यशिल माने म्हणाले, सद्याची महामारी आणि येवू घातलेला महापूर याच्या विरूध्द लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी डॉक्टरांची सेवा घ्यावी लागेल. त्यांना पीपीई किट देवून त्याबाबत नियोजन करावे. सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या 3 जिल्ह्यांसाठी समन्वय केंद्र उभारायला हवं. त्या माध्यमातून महापुराचे नियोजन करता येईल.

 यावेळी आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, महापौर निलोफर आजरेकर, आमदार विनय कोरे आदी चर्चेत सहभागी झाले.

पालकमंत्री म्हणाले-

-कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकोळी, सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर पहिली संयुक्त बैठक होणार आहे. एनडीआरएफला पत्र दिले आहे. प्रत्येक साखर कारखान्याने 2 बोटी द्याव्यात.  त्याचा जिल्ह्याला मोठा हातभार लागेल. एका विशिष्ट पाणी पातळीनंतर लोकांचे स्थलांतर करण्यात येईल. त्यासाठी त्यांना नोटीस देण्यात येईल.

शिरोळसाठी एनडीआरएफचं पथक मागवण्यासाठी पत्र दिले आहे. विशिष्ट पाणी पातळीनंतर पशुधन आणि लोकांचे स्थलांतर करण्याबाबत शिरोळ तालुक्याचा नियोजन आराखडा तयार करावा. पुराबाबतचे 20 कोटी यायचे आहेत. शिरोळचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील. पुढचे पीक कर्ज देण्याची सूचना वित्त मंत्र्यांनी दिली आहे.

-निलेवाडीसाठी शिरोली एमआयडीसीमधील उद्योजकांशी आमदार श्री. आवळे आणि इचलकरंजीतील एमआयडीसीतील उद्योजकांशी आमदार श्री. आवाडे यांनी चर्चा करून कारखान्यांची मोठी गोदामे पाहून ठेवावीत.

-15 जून नंतर महावितरणचे अधिकारी-कर्मचारी मुक्कामाला चंदगडमध्येच असतील. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनीही चंदगडचा दौरा करून नेटवर्कची समस्या सोडवावी. तालुक्याला बोटिंचे नियोजन केले जाईल.

-सार्वजनिक बांधकाम विभाग,जीएसडीए आणि पाटबंधारे विभाग यांनी आजरा, भुदरगड तालुक्यात भूस्खलन झालेल्या भागांची पाहणी करावी.

मास्टर प्लॅन तयार करा- पालकमंत्री

कोरोनाची जबाबदारी असली तरीही अधिकाऱ्यांनी महापुराबाबत मास्टर प्लॅन तयार करावा. मागील वर्षी आलेल्या अडचणी, त्याबाबतच्या उपाय-योजना, सद्याच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचवा. त्याबाबत नियोजन केले जाईल. बाधित लोकांची यादी तयार करून त्या-त्या गावात संदेश पोहचवण्याची यंत्रणा तयार करा. त्याचबरोबर स्थलांतरीत होण्यासाठी अर्ज भरून घ्यावेत, अशी सूचना करून महापुराच्या मुकाबल्यासाठी प्रत्येक तालुक्यात बोटिंची व्यवस्था करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

धोरणात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करू-ग्रामविकासमंत्री

पूरग्रस्त पुर्नवसन धोरण निश्चित करणे, अतिक्रमण असलेल्या घर मिळकतीबाबत अंशता व पूर्णत: पडझड झालेल्या बाधित कुटूंबांना घरभाडे व घरपडझडीची मदत देण्याबाबत मार्गदर्शन, स्थलांतरीत पशुधन यांना 70 रू. व 35 रू. निर्वाह भत्ता देणे, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी पूरग्रस्त महिलांना वाटप केलेल्या कर्जाच्या माफीबाबत धोरण, कृषी पंपधारकांची पूरकाळातील बिले माफ करणे, 9 रेस्क्यू फोर्समधील 389 स्वयंसेवकांसाठी मानधन अदा करणे आदी धोरणात्मक निर्णयासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.



Comments



Leave a Comment



WhatsApp