८६ पैकी केवळ १८ सदस्यांच्या उपस्थितीत मनपा सभा : सभा आणि निर्णयही रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर : द फायर – प्रतिनिधी:

कोल्हापूर महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सभेला ८६ पैकी केवळ १८ सदस्य उपस्थित होते. कोरम अभावी ही सभा दोनवेळा पुढे ढकलण्यात आली. तिसऱ्यावेळी अवघे १८ सदस्य उपस्थित असताना २५ कोटींची रस्त्यांची कामे व कोंबडी बाजार येथील महापालिकेची जागा पीपीसी तत्वावर व्यापारी संकुलाला मंजुरी देण्यात आली. ही सभा बेकायदेशीर आहे. त्यात झालेले निर्णय रद्द करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते सुरेश शामराव पोवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

सुरेश पोवार यांनी प्रधान सचिव यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिकेची मार्च २०२० मधील वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व नगरसेवकांना रितसर अजेंडा नोटीस पाठवून १९ मार्च रोजी बोलविण्यात आली होती. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सभा रद्द झाल्याचा निरोप महापौर निलोफर आजरेकर यांनी पाठविला. त्यामुळे सदर सभेला नगरसेवक हजर राहिले नाहीत. तरीही ८६ नगरसेवक असणाऱ्या महापालिकेत नियमित कामाकाजासाठी आलेल्या १८ नगरसेवकांना सभास्थानी बोलावून कोरम पूर्ण नसतानाही महापौरांनी सभा घेतली. या सभेत शहरातंर्गत २५ कोटींच्या रस्त्यांची कामे व कोंबडी बाजार येथील पीपीसी तत्वावरील व्यापारी संकुलाच्या कामाला मंजुरी दिली आहे. कोरम नसतानाही मनमानी पद्धतीने सभा घेतली गेली आहे. कोरम नसल्यामुळे त्याच दिवशी दोन वेळा सभा तहकूब केली होती. तिसऱ्यांदा कोरम नसताही बेकादयेशीरपणे सभा घेतलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ३ मधील प्रकरण २ मधील १ (फ) नुसार सभा न घेता या नियमाचे उल्लंघन करून घेतलेली सभा व सभेतील निर्णय रद्द करण्यात यावेत, तसेच बेकायदेशीर सभा घेण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणीही सुरेश पवार यांनी या निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी विभागीय आयुक्त पुणे व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांनाही पाठविली आहे.CommentsLeave a CommentWhatsApp