भल्याभल्यांना पुरून उरलेला एक साधा माणूस.........

कोल्हापूरःद फायरः प्रतिनिधीः

साधारण वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ. कोल्हापुरात जकात तस्करी करणारी एक मोठी गुन्हेगारी प्रवृत्ती होती. जकात चुकवून  माल कोल्हापुरात आणून पोहोचवणाऱ्या पाच ते सहा टोळ्या सक्रिय होत्या. या  टोळ्यांनी तस्करीसाठी गुंड पोसले होते. एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरार रोज कोणत्या ना कोणत्या जकात नाक्यावर घडत होता. जकात तस्करांचा पाठलाग कोल्हापूरकरांना नवा राहिला नव्हता. जकात तस्करांना महापालिकेची भीतीच नव्हती अशी परिस्थिती होती.

मात्र अशाही परिस्थितीत  भिकशेठ रोकडे नावाचा एक जकात अधीक्षक अपवाद होता.  त्यांची ड्युटी आहे म्हटल्यानंतर भल्याभल्या जकात तस्करांनाही विचार करायला लागत होता. भिकशेठ रोकडे एक माळकरी माणूस. गळ्यात तुळशीची माळ. कपाळावर बुक्का. .बोलायला खूप मवाळ आणि मितभाषी. पण जकात निरीक्षक म्हणून त्यांच्या लाल जीपमध्ये ते बसले की त्यांच्या अंगात एक वेगळीच ताकद संचारायची. भल्याभल्या जकात तस्करांच्या वाहनांचा ते पाठलाग करायचे त्यांची वाहने पकडायचे आणि कुणाच्याही दादागिरीला न जुमानता कारवाई करायचे आजूबाजूला जकात तस्करांनी पोसलेले टगे आणि त्यांच्यामध्ये रोकडे कमरेवर हात ठेवून उभे राहायचे. आरे ला कारे करायचे. आणि हिंमत असली तर माझ्या ताब्यातून माल घेऊन ,दाखवा असा कोल्हापुरी भाषेत दम द्यायचे. अर्थात असला जकात निरीक्षक या जकात तस्करांना नकोच होता. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना फरपटत नेण्याचा प्रकारही घडला. पण पुन्हा ताठ मानेने रोकडेंनी आपला करिष्मा कायम ठेवला. मनात आणले असते तर हा माणूस कोट्याधीश झाला असता. निवृत्तीनंतर रंकाळा तालीम मंडळाचे सचिव म्हणून हा माणूस काम पाहू लागला. प्रत्येकाला माऊली माऊली म्हणत सन्मान देत राहिला.

आता त्यांचे वय 77 होते. काल२८ जुलै एका खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. जकात तस्करीच्या कोल्हापुरातील काळ्या इतिहासाच्या पानात भिकशेठ रोकडे हा माणूस आपले वेगळे अस्तित्व नोंदवुन गेला. कोल्हापुरात खूप साधी माणसे मोठे काम करुन गेली. पण त्यांचे कर्तृत्व त्यांच्या पुरतेच मर्यादित राहिले. आपण कोल्हापूरकरांनी ही  कधी त्यांची फारशी दखल घेतली नाही. पण   जकात तस्करांचा कर्दन काळ ठरलेल्या भिकशेठ रोकडे यांच्या मृत्यूच्या निमित्ताने नव्या पिढीसमोर कोल्हापूरची ही साधी पण वेगळी माणसे आणण्याचा हा एक प्रयत्न. भावपूर्ण श्रद्धांजली...... ....

जेष्ठ पत्रकार सुधाकर काशीद.CommentsLeave a CommentWhatsApp