तेलनाडे गँगच्या सदस्यांना ५ ते १० डिसेंबरपर्यंत पोलिसांत हजर राहण्याचा हायकोर्टाचा आदेश

इचलकरंजी : द फायर - प्रतिनिधी

खंडणीप्रकरणी नरेंद्र भोरे यांनी दाखल केलेली याचिका रद्द ठरवावी यासाठी एस. टी. सरकार गँगचा म्होरक्या संजय शंकर तेलनाडे, सुनील शंकर तेलनाडे व अ‍ॅड. पवनकुमार अशोक उपाध्ये यांनी दाखल केलेले अर्ज सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. तर अ‍ॅड. उपाध्येसह अन्य फरारी संशयितांनी ५ ते १० डिसेंबरपर्यंत तपासी अधिकाऱ्यांकडे हजर राहाण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.

घटस्फोट प्रकरणात समेट घडवून आणण्याच्या नावाखाली २५ लाख रुपयांच्या खंडणी वसुलीसाठी बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात तेलनाडे बंधू व उपाध्ये यांच्यासह १२ जणांविरोधात नरेंद्र सुरेश भोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ऋषिकेश शिंदे, इम्रान कलावंत, अरिफ कलावंत व संदेश कापसे या चौघांना अटक केली. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. भोरे यांनी केलेली तक्रार खोटी असून ती रद्दबातल ठरविण्यात यावी, अशी याचिका तेलनाडे बंधू व अ‍ॅड. उपाध्ये यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या खटल्यात सरकारच्यावतीने अ‍ॅड. अरुणा पै काम पहात आहेत.

या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांनी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला. तर अ‍ॅड. उपाध्ये याच्यासह फरारी संशयित अरविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे व राहुल चव्हाण यांनी ५ ते १० डिसेंबरपर्यंत तपासी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले.CommentsLeave a CommentWhatsApp