आता अवघ्या ३० मिनिटांत 'कोरोना'चे निदान, ऑक्स्फर्डच्या संशोधकांचे 'रॅपिड टेस्ट किट'

लंडन : आतापर्यंत कोरोनाव्हायरसचे निदान करण्यासाठी घेतलेल्या चाचणीचे रिपोर्ट येण्यासाठी तब्बल दोन तास लागत होते. मात्र आता नव्या चाचणी पद्धतीमुळे अवघ्या ३० मिनिटांतच कोरोनाव्हायरसचे निदान होऊ शकेल.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कोरोनाव्हायरससाठी रॅपिड टेस्टिंग पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरस आहे की नाही, हे फक्त ३० मिनिटांत समजते. संशोधकांनी याची चाचणीही केली आणि ती १०० टक्के यशस्वी असल्याचे दिसते आहे. आधीच्या टेस्टमध्ये कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आढळलेल्या एकूण १६ जणांवर ही टेस्ट पुन्हा करण्यात आली आणि त्याचे रिपोर्टही अगदी योग्य होते.

या नव्या टेस्टसाठी फक्त हिट-ब्लॉकची गरज आहे, जे RNA आणि DNA च्या तापमानासाठी गरजेच्या आहेत. या टेस्टसाठी इतर कोणत्याच उपकरणाची गरज नाही. फक्त नमुन्याचा रंग बदल पाहून  कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे फक्त डोळ्यांनीच ओळखता येणार आहे. ही टेस्ट ग्रामीण भागात किंवा आरोग्य केंद्रांमध्ये खूप फायदेशीर ठरू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

संशोधकांच्या मते, या रॅपिड टेस्टमुळे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोनाव्हायरसचे निदान होऊ शकेल. कोरोनाव्हायरसचे निदान लवकर झाल्याने उपचार लवकर सुरू करता येतील आणि त्यामुळे व्हायरसचा प्रसारही रोखण्यात मदत होईल.

सध्या तरी या टेस्टला यूकेमध्ये वैद्यकीय मान्यता मिळालेली आहे. इतर ठिकाणीही जर या टेस्टला मान्यता मिळाली तर कोरोनाव्हायरसला आळा घालण्यात या टेस्टची खूप महत्त्वाची भूमिका असेल. आता ऑक्सफर्डची टीम असे उपकरण तयार करते आहे, जे क्लिनिक, विमानतळ आणि अगदी घरच्या घरीही वापरता येऊ शकेल.CommentsLeave a CommentWhatsApp