महाराष्ट्र, केरळात कोरोनाचे प्रत्येकी १२ नवीन रुग्ण; देशात २९९ रुग्ण, तेलंगणकडून सीमा सील

मुंबई : देशात कोरोनाव्हायरस वेगाने पसरतो आहे. २४ तासांत तब्बल ९८ रुग्ण आढळलेत. देशात करोनाच्या रुग्णांची संख्या २९९वर पोहोचली आहे. यात ३९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र व केरळमध्ये आज एकाच दिवशी प्रत्येकी १२ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मधील संख्या ६४ वर तर केरळमधील करोनाबाधितांची संख्या आता ५२ वर पोहचली आहे. कोरोनाचे संशयीत रुग्ण महाराष्ट्राच्या हद्दीतून तेलंगणात येऊ नये यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा सीमा सील करण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतला आहे.

तेलंगणा सरकारने सीमेवर तब्बल १८ चेकपोस्ट उभारले असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या सगळ्या राज्याच्या सीमेवर असे चेकपोस्ट नाहीत, त्यामुळे इतर राज्यातून कोरोनाचे संशयीत रुग्ण महाराष्ट्रात आले तर काय होईल, असा प्रश्न सीमावर्ती भागातल्या जनतेला आहे.

महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४  झाली आहे. त्यामध्ये ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी १ रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत. मुंबईत आढळलेल्या ८ रुग्णांपैकी ६ जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहीणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

कर्नाटकमध्ये आणखी तीन जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे कर्नाटकातील करोनाच्या रुग्णांची संख्या १८वर गेली आहे. १२ करोनाबाधित प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केल्याचं भारतीय रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सोबतच, गरज नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनानं दिलाय. लडाखमध्ये आणखी तीन जण करोना पॉझिटिव्ह, लेहमध्ये दोन तर कारगिलमध्ये एकाला करोनाचा संसर्ग. लडाखमधील करोनाच्या रुग्णांची संख्या १३वर गेली आहे. पश्चिम बंगालमध्ये स्कॉटलँडवरून आलेली महिला करोना पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या तीनवर गेली आहे. पंजाबमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या आंतरराज्य सेवा बंद, अनेक बसेस रद्द केल्या आहेत. करोनाचे ४ रुग्ण आढळल्याने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बाजर आणि दुकानं बंद झाली आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी २ आठवड्यांपर्यंत पार्ट टाइम काम करावं, असे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp