दहावीचा सोमवारी होणारा अखेरचा पेपर लांबणीवर

मुंबई : द फायर - प्रतिनिधी

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरादारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र दहावीची परीक्षा पूर्वनियोजित वेळेनुसारच होणार, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता दहावीच्या सोमवारी होणाऱ्या एका विषयाचा अखेरचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. सोमवारी २३ मार्च रोजी भूगोल आणि सामाजिक शास्त्र-२ चा पेपर आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता  सोमवारी होणारा पेपर आता ३१ मार्च नंतर होणार आहे.  ३१ मार्चनंतर परीक्षा पेपरची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दरम्यान,  कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शालेय परीक्षांसदर्भात शुक्रवारी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.

 CommentsLeave a CommentWhatsApp