करोनाची धास्ती, पुण्यात अनेक आयटी कंपन्यांचे 'वर्क फ्रॉम होम'

पुणे: पुण्यात करोनाचा धोका लक्षात घेता कर्मचाऱ्यांनी तूर्त 'वर्क फ्रॉम होम' करावे. आवश्यकती सर्व काळजी घ्यावी, असे मेसेज आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवले आहेत. पुण्यात करोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून सर्वच पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन केले आहे.

होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबीयांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. त्याचवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सतर्कतेचे आवाहन केले आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा, असे आवाहन टोपे यांनी केले.

पुण्यातील दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. महाराष्ट्रातील हे करोनाचे पहिलो दोन रुग्ण आहेत. हे दाम्पत्य २० ते २९ फेब्रुवारी दरम्यान दुबईला गेलं होतं. १ मार्चला ते पुण्यात ते परतले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून दोघांनाही सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळे सोमवारी दुपारी ते दोघेही नायडू रुग्णालयात दाखल झाले. त्यांना स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात त्या दोघांना करोना या विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. हे दोघे रुग्ण पुण्यातील रहिवासी आहेत. ते ४९ आणि ५१ वर्षांचे आहेत. हे दोघे महाराष्टातील पहिले करोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य खात्याचे राज्य रोग सर्वेक्षणअधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.CommentsLeave a CommentWhatsApp