धामणी प्रकल्पावरून पी. एन. पाटील-चंद्रदीप नरके यांच्यात रंगला श्रेयवाद

कोल्हापूर : द फायर - प्रतिनिधी

दीर्घकाळ प्रतिक्षा असलेल्या धामणी प्रक्लपाच्या पूर्णत्वासाठी फेरनिविदा आणि सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र त्यावरून करवीरचे विद्यमान आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. आपल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागल्याचा पी. एन. पाटील यांचा दावा आहे. तर गेली कैक वर्षे आपण या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनी त्याचे श्रेय घेऊ नये, असा टोला चंद्रदीप नरके यांनी लगावला आहे.

धामणी प्रकल्पाच्या मान्यतेसाठी गेली सात वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेक बैठका, निवेदने आणि आंदोलने केली आहेत. पाठपुराव्यानंतरच २७७ कोटींची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यास यश मिळाले आहे. तीन महिन्यांच्या पाठपुराव्याने नव्हे, तर सात वर्षांच्या पाठपुराव्याला यश आल्याचा टोला माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पी. एन. पाटील यांना लगावला आहे.

विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार पी. एन. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर श्री. नरके यांनी अप्रत्यक्ष टीका केली. श्री. नरके म्हणाले, माझे आजोबा माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या पाठपुराव्याने तेव्हाच्या युती सरकारने १९९६ मध्ये धामणी प्रकल्प मंजूर केला. तत्कालीन जलसंपदामंत्री महादेव शिवणकर यांनी त्यासाठी मदत केली. मंजुरीवेळी या प्रकल्पाची किंमत १०५ कोटी इतकी होती. यानंतर दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता ३२४ कोटी इतकी होती. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याकडे या धरणाच्या कामासाठी पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळात एसआयटी चौकशीत हा प्रकल्प अडकला गेला. त्या वेळीही ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावर कारवाई करा, पण हा प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली होती, असेही श्री. नरके यांनी सांगितले.

सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही साकडे घालण्यात आले. त्यानंतर या कामाला गती मिळाली. निवडणुकीच्या धामधुमीत सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न मागे पडला होता. त्यानंतर विद्यमान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाठपुरावा केला. या सर्व पाठपुराव्याला यश आले आणि आता २७७ कोटींची फेरनिविदा प्रसिद्ध झाल्याचे श्री. नरके यांनी सांगितले.CommentsLeave a CommentWhatsApp