मुलाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम पोलिसांनी बंद पडून एकावर गुन्हा दाखल

गडहिंग्लज (द फायर - प्रतिनिधी) : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी असतानाही मुलाच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज  येथे आयोजन केलेला कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला. याप्रकरणी येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे. शरद शिवराम येसरे (वय 50, रा. कोड्ड कॉलनी, गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. अशा प्रकारचा गुन्हा गडहिंग्लज तालुक्‍यात प्रथमच दाखल झाला आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्याचा उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे. त्याबाबतची माहिती माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच पोलिस प्रशासनामार्फतही नागरिकांना आवाहन केले जात आहे. असे असतानाही शरद येसरे यांनी आपला मुलगा सौरभ याच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.20) सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोड्ड कॉलनीतील राहत्या घरी मित्रपरिवार व नातेवाईक अशा 50 ते 60 लोकांना एकत्र बोलावले होते.

दरम्यान, कोड्ड कॉलनीत कार्यक्रमासाठी गर्दी झाल्याची माहिती पोलिसांना कळाली. पोलिस तातडीने कोड्ड कॉलनीत दाखल झाले. त्यांनी हस्तक्षेप करीत हा कार्यक्रम बंद करण्यास भाग पाडले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली मित्रपरिवार व नातेवाइकांना बोलावून जमाव गोळा करुन लोकसेवकांचा आदेश पाळला नसल्याबद्दल शरद येसरे याच्याविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉंस्टेबल विनोद पवार यांनी याबाबतची फिर्याद दिली असून  अधिक तपास करीत आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp