कोरोनाचा वाढता प्रसार; शरद पवार यांनी थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी साधला संपर्क

मुंबई : द फायर - प्रतिनिधी

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात अत्यंत योग्य निर्णयासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार ओळखले जातात. कोरोनाच्या राज्यातील परिस्थितीवरही शरद पवार लक्ष ठेवून आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ वरुन ६३ वर गेल्यानंतर प्रत्येकाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारला कायम मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना फोन केला आणि २० मिनिटे त्यांनी चर्चा केली. कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे, असे त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिले.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात शरद पवार स्वतः दुवा बनल्यामुळे समन्वय अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने आपल्याला चाचणीची परवानगी द्यावी, त्यासाठी केंद्राने किट द्याव्यात, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी आज सकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आणि राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. राज्य सरकार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उपकरणे देण्यासाठी तयार आहे, पण या वैद्यकीय महाविद्यालयांना कोरोना चाचणीची किट उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने देशातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांसाठी एक सूचना जारी केली आहे. देशातील सर्व खाजगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना रुग्णालयात बेड शिल्लक ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विलगीकरण कक्ष, पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मास आणि अतिरिक्त मनुष्यबळ यांची तयारी ठेवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, विलगीकरण सुविधा निर्माण करण्यासाठी काही बेड राखीव ठेवण्यात यावेत. प्रत्येक खाजगी आणि सरकारी रुग्णालयासाठी हा नियम असेल. रुग्णालयांनी आवश्यक मनुष्यबळ, मास्क, ग्लोज आणि इतर साहित्यांचा आढावा घ्यावा. आरोग्य कर्मचाऱ्याला कोणत्याही अभूतपूर्व परिस्थितीसाठी प्रशिक्षित केले जावे, असे निर्देश देण्यात आले आहे.CommentsLeave a CommentWhatsApp