मोदी सरकारचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा: सोनिया गांधी यांची टीका

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि देशभरातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, एमके स्टालिन यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती होती.शिवसेना नेते प्रथमच काँग्रेस अध्यक्षा गांधी यांनी बोलविलेल्या बैठकीला हजर राहिले.

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे  पॅकेज जाहीर केले आहे. शेतकरी, स्थलांतरित मजूर, लघु आणि मध्यम उद्योजक आणि गरीबांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यातल्या तरतुदीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चार दिवस पत्रकार परिषदही घेतली. मात्र हे सगळे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी विरोधकांची फक्त एकच बैठक घेतली, पण आणखी बैठका घेणं अपेक्षित होतं. उद्योग क्षेत्राच्या पुनरुज्जीवनावर भर दिला जाणं आवश्यक आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आणि बेरोजगारीचं संकट गंभीर आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. शैक्षणिक क्षेत्राचं मोठं नुकसान होतं आहे. शैक्षणिक सत्र कोलमडलं आहे. शिक्षण संस्थाही अडचणीत आल्या आहेत, त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी एका शिक्षण समितीची गरज आहे.

केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं असलं तरी त्याचं नोटिफिकेशन बँकांना मिळालेलं नाही, त्यामुळे अंमलबजावणी कशी होणार, असे मुद्दे शरद पवार यांनी या बैठकीत मांडले.लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरू करण्याबाबात योग्य पावलं उचलण्याची गरज आहे. राज्यांतर्गत रस्ते वाहतूक, रेल्वे सेवा आणि हवाई वाहतूक हळूहळू सुरू केली गेली पाहिजे, असं सांगत शरद पवार म्हणाले , लॉकडाऊनमध्ये राज्यांकडून शिथीलता आणली जात असली तरी कंपन्या सुरू होऊ शकत नाहीत, कारण मजूर गावाला परतले आहेत. या मजुरांना परत आणण्यासाठी रणनिती आखली गेली पाहिजे.



Comments



Leave a Comment



WhatsApp