अम्फन चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हानी;७२ जणांचा मृत्यू

कोलकत्ता:  पश्चिम बंगालला बुधवारी महाचक्रीवादळ अम्फनमुळे प्रचंड हानी झाली असून आतापर्यंत ७२ जणांचा बळी घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चक्रीवादळाला करोना विषाणूपेक्षाही भयानक म्हटले आहे. गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अम्फन चक्रीवदाळामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही यावेळी त्यांनी केली. आतापर्यंत इतकं भयानक चक्रीवादळ मी कधीही पाहिलं नव्हते, असेही त्या म्हणाल्या.  यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाडे पडल्यामुळे झाला आहे. ओडिशामध्येही तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात बचाव कार्य सुरु आहे.  तसेच बांगलादेशमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अम्फन चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे समुद्र किनारी भागांमध्ये वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला असून मोठं नुकसान झालं आहे. सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवले असून वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाला.



Comments



Leave a Comment



WhatsApp