कोरोना रूग्णांची तपासणी 5 हजारपर्यंत वाढवणार 3800 ॲन्टीजेन टेस्टींग किटचे वाटप; 20 हजार बुधवारपर्यंत उपलब्ध :पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः  सध्या 2 हजार रूग्णांची तपासणी होत असून त्यामध्ये वाढ करत त्या 5 हजारापर्यंत करण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त तपासणी झाल्यास संक्रमण थांबविता येईल. जिल्ह्यामध्ये 3800 रॅपिड ॲन्टीजेन टेस्टींग किट्सचे वाटप करण्यात आले असून बुधवारपर्यंत 20 हजार किट्स उपलब्ध होतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असली तरी डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही मोठे आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास परवानगी दिली आहे. वडणगे ग्रामपंचायतीपासून याची सुरूवात झाली आहे. आजअखेर 358 बाधीत घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या रूग्णांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिजीटल थर्मामीटर, ॲजीथ्रोमायसिन, व्हिटॅमिन सी,  मास्क याचा समावेश आहे. त्याचा वापर करण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील नागरी आरोग्य केंद्र व प्रभाग जोडण्यात येणार आहे.

-जिल्ह्याचे प्रमुख उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर.मध्ये एकूण 380 बेड संख्या आहे. एकूण 54 व्हेंटिलेटर, 15 एनआयव्ही, हायफ्लोनेझल ऑक्सीजन 20, आणखी 20 व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. 250 ऑक्सीजन बेड जोडले जात आहेत.

-डीसीएचसी आणि डीसीएच ला 5 एक्सरे मशिन दिले जात आहेत

-दररोज 2000 स्वॅब नमुने तपासणीसाठी येत असल्याने अहवालासाठी वेळ लागत आहे. तपासणी थांबली नव्हती. अतिरिक्त आरएनए एक्सट्रॅक्शन मशीन आले असल्याने ही तपासणी 5000 पर्यंत आठवड्याभरात जाईल.

-सी.पी.आर. मध्ये अतिरिक्त नॉन कॉव्हिड विभागात ऑक्सीजन लाईनचे काम सुरू आहे.

-व्हीआरडीएल खासगी लॅबमध्ये नाही. ती केवळ शासकीय लॅबमध्येच आहे. ॲन्टीजेन रॅपिड टेस्टमध्ये रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला तरी आरटीपीसीआर मशिनवर तपासण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

-जिल्ह्यासाठी एकूण ॲन्टीजेन टेस्ट किट 60 आले होते. एका किटमध्ये 25 टेस्ट तपासणी होतात. 4 हजार अतिरिक्त किट्स ग्रामीण भागात देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

-बायोमेडिकल वेस्टसाठी स्वतंत्र एजन्सी नेमली आहे.

-सी.पी.आर. मध्ये महिलांसाठी स्वतंत्र अलगीकरण कक्ष आहे.

-सी.पी.आर. मध्ये 13 केएल ऑक्सीजन टँक बसविण्यात येणार असून जम्बो सिलेंडर व लिक्वीड ऑक्सीजन प्राधान्याने उपलब्ध केले आहे.

-नियंत्रण कक्षातून सरासरी दिवसाला 440 फोन स्वीकारण्यात आले आहे. 6 दिवसात 2646 फोन घेण्यात आले. त्यापैकी 302 जणांना बेडबाबत मार्गदर्शन करण्यात आले, असेही पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील सीसीसी साठी 44 फिजीशियन -

जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, सी.पी.आर.मधील वैद्यकीय अधिकारी आणि खासगी फिजीशियन यांचा एक तालुकानिहाय ग्रुप तयार करण्यात आला आहे.  कोव्हिड केअर सेंटरना 44 फिजीशियन डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. टेलीमेडीसिनद्वारे मार्गदर्शन करतील.

 जादा बील आकारणी करणाऱ्या रूग्णालयांची तक्रार करा- आयुक्त

महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीबाबत लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही संख्या अपुरी पडत असल्याने इतर विभागातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जास्त आकारणी केल्याची तक्रार मनपाच्या लेखापरीक्षण विभागाकडे करावी.

सी.सी.सी. केंद्र माहिती-

-पहिल्या टप्प्यात 14, दुसऱ्या टप्प्यात 33, सध्या कार्यान्वित 35 कोव्हिड काळजी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

-बेडची एकूण उपलब्धता 5268 आहे. ऑक्सीजन बेड 245.

-16 सीसीसीमध्ये आरटीपीसीआर स्वॅब टेस्टींग

-7 सीसीसीमध्ये रॅपीड ॲन्टीजेन टेस्टींग

-प्रत्येक सीसीसीला 6 डॉक्टर व 6 नर्ससह लॅब टेक्नीशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर व स्वच्छता कर्मचारी, स्वच्छ निर्जंतुक पाणी, चहा, नाश्ता व जेवणाची उत्तम सोय.

-संदर्भ सेवेकरिता 17 रूग्णवाहिका (108)

-योगा मेडिटेशनची काही ठिकाणी सुरूवात.

-सर्व सीसीसीला वाहतूक व्यवस्थेसह टेलीमेडीसिन सुविधा उपलब्ध आहे.प्रत्येक सीसीसीला प्रगत क्लिनिकल उपचार प्रोटोकॉल ठेवण्यात आला आहे. टास्क फोर्सशी जोडण्यात आला आहे.

-समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रामध्ये 1112 व समर्पित आरोग्य दवाखान्यात 1112 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

 रॅपिड ॲन्टीजेन टेस्टींग किट वितरण-

आय जी एम इचलकरंजी - 1000,कोल्हापूर महानगरपालिका - 1000,हुपरी कोव्हिड केअर सेंटर – 500,शिरोळ (जे.जे.मगदूम)- 500गडहिंग्लज – 300, आजरा – 200,चंदगड - 300

 90 मृत्यू हे कोमॉर्बिडमुळे पालकमंत्री

एकूण मृत्यू पैकी 90 जणांचे मृत्यू हे जुने व्याधीग्रस्त असल्यामुळे झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 24 तास, 48 तासात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अजिबात अंगावर न काढता लक्षणे दिसल्यास ताबडतोब स्वॅब तपासणी करून उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.CommentsLeave a CommentWhatsApp