कोल्हापूरला ३५ वर्षे प्रतीक्षा खंडपीठाची; पावणेदोन कोटी नागरिकांचे लक्ष शासन निर्णयाकडे

कोल्हापूर (द फायर प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जेष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री या विषयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असून याविषयी मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी या भेटीत सांगितले. खंडपीठ स्थापन होण्यास ठाकरे सरकारने हिरवा कंदील दिला असला तरी तूर्तास यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खंडपीठ निर्मितीचे सर्वच निकष कोल्हापूरने पूर्ण केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयापासून साडेपाचशे किलोमीटर अंतर आणि ६० हजार प्रलंबित खटल्यांची संख्या याचा विचार करूनच कोल्हापूरसाठी खंडपीठाची मागणी बऱ्याच वर्षांपासून सुरू झाली होती. भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर हे सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सोयीचे आहे. आसपासच्या सर्वच जिल्ह्यांनी सातत्याने कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला सक्रिय पाठिंबा दिला आहे. यासाठी कृती समिती स्थापन करून टप्याटप्याने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतले. या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन खंडपीठासाठी सरकारने पाठपुरावा करावा, अशी विनंती केली आहे.

कोल्हापुरात खंडपीठ स्थापन होऊ नये, यासाठी पुण्याबरोबरच मुंबईचाही विरोध आहे. मात्र, कोल्हापुरात खंडपीठ स्थापन झाल्यास ते सहा जिल्ह्यांसाठी सोयीचे आहे. आणि यासाठी कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे, अशी आपली भूमिका असल्याचे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर भेटीत सांगितले होते. खंडपीठासाठी झडत असलेल्या चर्चा, भेटीगाठी आणि आश्वासनानंतरही याप्रश्नी केवळ सकारात्मक चित्रच आहे. मात्र, हालचाली अजून दिसून येत नाहीत.

सध्या मुंबई येथे असणारी उच्च न्यायालयाची इमारत कोर्ट कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी ५५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यापेक्षा न्यायालयाचे विकेंद्रीकरण करून कोल्हापूरला खंडपीठ  स्थापन करावे. यामुळे सहा जिल्ह्यांतील पावणेदोन कोटी नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp