मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या २२ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली: मध्य प्रदेशमधील राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या 22 आमदारांनी आज शनिवारी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ज्योतिरादित्य शिंदेही उपस्थित होते. या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळेच मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसच सरकार कोसळले होते. या २२ आमदारांमध्ये राज्यातील सहा मंत्र्यांचाही समावेश आहे.  

भाजपची विचारधारा आणि धोरणे आवडल्यामुळेच काँग्रेसच्या या  आमदारांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आम्ही या सर्वांचे पक्षात स्वागत करतो, असे भाजपचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच हे सर्व 22 आमदार आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बंगळुरूमधील रामदा हॉटेलमध्ये ते थांबले होते. या आमदारांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे पक्षीय बल कमी झाले होते. त्यामुळे राज्यातील कमलनाथ यांचे सरकार अडचणीत आले होते. सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले पण बहुमत सिद्ध कऱण्याआधीच कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

 CommentsLeave a CommentWhatsApp